Alternate Text

गुरु कुणाला म्हणतात ? गुरूंचे स्वरूप काय ?

गुरु कुणाला म्हणतात ? गुरूंचे स्वरूप काय ?

प्रश्न : गुरु कुणाला म्हणतात ? गुरूंचे स्वरूप काय ?

उत्तर : गु म्हणजे गुप्त आणि रु म्हणजे रूप. आत्म्याचे गुप्त रूप साधकाला दाखवणारा, साधकाच्या अनुभवास आत्मरूप आणून देणारा(१) तो गुरु. आत्म्याचे गुप्त अंग जो दाखवितो तो गुरु.

गुरुपद म्हणजे तत्पद. तत्पद म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चार देहांच्या पलीकडे असणारे आत्मतत्त्व. तत्पद म्हणजे सत्पद. सत्पद म्हणजेच चित्पद. म्हणून गुरु हे चैतन्यरूप आहेत व त्यांचे पदही चैतन्यरूप आहे. चैतन्य हेच गुरूचे स्वरूप आहे. गुरु हे देहातीत व चैतन्यरूप असतात. निरुपाधिक जीवन हेच त्यांचे खरे स्वरूप. गुरु हा सत्तारूप आहे. गुरु सोहंरूप आहेत. सोहंमधील आकाश म्हणजे चिदाकाश. चिदाकाशात आत्मा तेजोरूपाने आहे; तेच गुरूचे खरे स्वरूप आहे. तेथेच गुरूंचा वास असतो.

प्रश्न : व्यवहारात गुरु कसे असतात ? त्यांची आवश्यकता काय ?

उत्तर : ज्याला मी गुरु आहे असे वाटत नाही तोच गुरु. दुस‍र्याला गुरुत्व देतो म्हणूनच तो गुरु. ज्याला आपला शिष्य मोठा व्हावा असे वाटते, तोच खरा गुरु. ख‍र्या गुरूला स्वतःच्या शिष्याचा मोठेपणा पाहून आनंदच व्हावयास पाहिजे. ख‍र्या गुरूचे अंतःकरण अतिशय मोठे असते.

देहातीत, दृश्यातीत अशा आत्म्याला दाखविण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे, त्यासाठी त्यांची कृपा हवी आहे. गुरुकृपेने शिष्याच्या मनाचा तोल ढळत नाही. गुरुविना चैतन्याचा अनुभव येत नाही. गुरूंचा चैतन्यरूप हात मस्तकावर आला तर आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून गुरुपेक्षा मोठे जगात अन्य कोणीही नाही.

प्रश्न : सद्‍गुरु कुणाला म्हणतात ? त्यांचे खरे स्वरूप कोणते आहे ?

उत्तर :सत अशा स्वरूपास दाखवितो तो सद्‍गुरु. देह हे सद्‍गुरूंचे खरे स्वरूप नव्हे. सद्‍गुरु म्हणजे केवळ देहाकृति नव्हे. निखळ चैतन्य म्हणजेच सद्‍गुरु. सोहंच्या स्वरूपात सद्‍गुरु नटलेले आहेत. चित्शक्ति, चैतन्य, सद्‍गुरु हे सर्व एकच आहेत. सद्‍गुरु त्रिगुणांचे अतीत असतात.

सोहमकडे ध्यान लागले पाहिजे. साधनाच्या अभ्यासात राहिल्याशिवाय सोहंरूपाची ओळख होणार नाही. चैतन्यरूप सद्‍गुरूंची पाऊलेसुद्धा चैतन्यरूपच आहेत. सहस्रदलात जी सोहम गति आहे, ती गति म्हणजेच सद्‍गुरुचरण; तेच चरण गतिरूप आहेत.

"ब्रह्मानंदं परमसुखदं" इत्यादि श्लोकात सद्‍गुरूंचे खरे स्वरूप सांगितलेले आहे. ते असे :- ज्यात ब्रह्मानंदाची प्राप्ति आहे, जे अखंड सुख आहे, ज्या ज्ञानातून ज्ञान आणि अज्ञान यांची उत्पत्ति आहे, जे द्वैतापलीकडे आहे, जे आकाशाप्रमाणे अमाप व अगोचर आहे, जे सर्वांत साक्षीरूपाने आहे, ज्यात चंचलता नाही, जेथे भाव नाहीत, जे त्रिगुणरहित आहे, असे सद्‍गुरूंचे स्वरूप आहे. सद्‍गुरूशिवाय दुसरा देव नाही.

प्रश्न : सद्‍गुरु व कल्पवृक्ष यांच्यांत काय फरक आहे ?

उत्तर : सद्‍गुरु व कल्पतरु यातील फरक असा :- कल्पतरु जे मागेल ते देतो. कल्पतरु आपल्या देण्याने जीवाचे हित होईल की अनहित हे पहात नाही. तसे सद्‍गुरूंचे नाही. सद्‍गुरु शिष्याला फक्त आपल्या हिताचेच तेवढे देतात.

प्रश्न : गुरु /सद्‍गुरु हे कोणते कार्य करतात ? त्यांचे सामर्थ्य काय आहे ?

उत्तर :चैतन्य हे सत्तारूपाने सर्वत्र भरून आहे, हे दाखविण्याचे काम सद्‍गुरु करतात. सद्‍गुरु आत्मसाक्षात्काराची वाट दाखवून देतात; परंतु वाटचाल ही ज्याची त्यालाच करावी लागते.

सद्‍गुरूंच्याशिवाय नामाची प्राप्ति नाहींआम हा सद्‍गुरुकृपेचा विषय आहे.

सद्‍गुरूंच्यासारखे उदार जगात दुसरे कोणी नाही. सद्‍गुरु हे फार दयाळु असतात. `हा जीव साधन करणारा आहे.' एवढे त्यांच्या दृष्टीस यायचाच अवकाश, ते कृपा केल्यावाचून रहात नाहीत.

आपल्या शरीराला व मनाला विश्रांति लागते. तशीच प्राणालाही विश्रांति लागते. प्राण म्हणजे काही भाड्याचे घोडे नव्हे. प्राणाला विश्रांति देण्याचे सामर्थ्य सद्‍गुरूंच्याजवळ आहे. म्हणून त्यांना प्राणेश्वर म्हणतात.

प्रश्न : शरीर आणि वायु यांचा संबंध काय आहे ?

उत्तर :वायुलहरी हे जीवनाचे माध्यम आहे. वायुलहरीइतके निकटचे नाते जगात नाही. पंचमहाभूते एकत्र येऊन हे शरीर बनते. हे माझे शरीर आहे, ही जाणीव ज्यामुळे होते, ते शरीराच्या आतले वारे मात्र वेगळे आहे. ज्याने शरीर उभे केले, ज्याच्यामुळे मीच देह आहे असे खरे खोटे काहीतरी वाटते, ज्याच्या अभावी मी देह आहे, ही जाणीव उरत नाही, असे वारे आपल्या शरीरात खेळते आहे; ते काय बाहेरच्या पंचमहाभूतातील वा‍र्यासारखे आहे? की पंख्याच्या वा‍र्यासारखे आहे ? की टायरीत भरलेल्या वा‍र्यासारखे आहे ? ते वारे अगदी वेगळे आहे. ते वारे चैतन्यरूप आहे. त्याची जाणीव आपल्याला असत नाही. ती जाणीव करून देण्याचे कार्य संत करतात.

वा‍र्याच्या दर्शनाकरता वा‍र्याचीच जरुरी. बाहेरील वारा बंद झाला की आतील वारा सुरू होतो. वायूची व मनाची गाठ पडली की मनाचे मनत्व रहात नाही. अंतर्बाह्य वायुलहरीची प्रचीती ज्याची त्यानेच घ्यावयाची आहे. वायूशी लहरीचे तादात्म्य हाच परमार्थ.

प्रश्न : ब्रह्माचे स्वरूप शब्दांनी कशा प्रकारे सांगता येते ?

उत्तर :ब्रह्म हे सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद म्हणजे सत, चित आणि आनंद किंवा अस्ति, भाति आणि प्रिय. सत म्हणजे अस्तित्व. सत्चा विलास म्हणजे चित. सत मध्ये चित मिसळले की आनंद. अस्तित्व आणि चैतन्य असेल तरच आनंदाचा अनुभव येतो. चित + आनंद = सत आहे. म्हणजेच चैतन्य असून आनंद असल्यास सत असलेच पाहिजे. आनंद + सत = चित आहे म्हणजे सत्ला आनंद असेल, तर तेथे चित असलेच पाहिजे.

ब्रह्म म्हटले की तेथे माया आली. जे मायेत आहे असे दिसते पण जे मायेच्या तडाख्यात सापडत नाही, तेच ब्रह्म आहे. खरे व खोटे जेथे समजत नाही व ज्यास खरे किंवा खोटे असे काहीच म्हणता येत नाही, असे जे निरपेक्ष स्थान तेच ब्रह्म होय.

ब्रह्म म्हणजेच माया आहे. भूमितीतील १ बिंदूप्रमाणे ब्रह्म आहे. भूमितीत बिंदू हे एकापुढे एक ठेवले की रेषा होते. या रेषेप्रमाणे माया आहे. माया कळली तर १ भूमितीतील बिंदू असा असतो :- ज्याला लांबी नाही, रुंदी नाही व खोली नाही, तो बिंदु. -(संपादकाची टीप)

"तू सद्‍गुरू शोधुनि पाही तीनदा." याचा अर्थ तीन गुरु करावयाचे असा नाही. तर एकाच गुरूचे स्थूल, सूक्ष्म व चैतन्य रूप हे शोधावयाचे आहे.

सद्‍गुरूंच्याबद्दल व्यक्तिनिष्ठेलाच जास्त किंमत आहे. त्यामुळे शिष्याची सर्व जबाबदारी सद्‍गुरूंवरच पडते. सद्‍गुरूंचेविषयी आपली जशी भूमिका, निष्ठा असेल, त्याप्रमाणे फळ मिळते. शिष्याने स्वतःची भूमिका स्वतःच तयार केली पाहिजे. गुरु कळला पाहिजे. गुरुभक्ति व्हायला पाहिजे. दुसरे संत कितीही मोठे असले तरी आपले सद्‍गुरु आपल्याला सर्वांहून मोठे वाटले पाहिजेत.

मरणाचे वेळी परमेश्वराचे नाव आड करण्याचे सामर्थ्य ज्याच्याजवळ येते तो गुरुपुत्र/शिष्य. ज्याची परीक्षा घेण्यास काही शिल्लक राहिले नाही, तो सत शिष्य.

स्वतः काही न करता, अनुभव येत नाही, म्हणून दुस‍र्या गुरूकडे जाणे हे अयोग्य आहे.

प्रश्न : गुरूचा अनुग्रह घेऊन वाटेल ते करणा‍र्याला तो अनुग्रह कसा फलदायी होईल ?

उत्तर :माणसाची आपल्या सद्‍गुरूविषयीची भावना कायम रहात नाही. आणि म्हणूनच त्याला अनुभव येत नाही. तात्यासाहेब कोटणीसमहाराज म्हणत असत :- `अनुग्रह घेतल्या दिवसापासून सात दिवसपर्यंत अनुग्रह घेणेपूर्वी सद्‍गुरूविषयी जी भावना होती, ती जर कायम राहील, तर तो मनुष्य मुक्त होईल.'

सद्‍गुरूंचेवर जशी निष्ठा असेल त्या प्रमाणात साधन होते आणि ज्या प्रमाणात साधन होते, त्या प्रमाणात साक्षात्कार होतो.

गुरु-शिष्याचा संबंध हा असा संबंध आहे की त्याला तोड नाही. याच्याइतका निकटचा संबंध दुसरा कोणताही नाही. गुरु-शिष्य हे चैतन्याचे द्वारा एकरूप होतात. तोच आत्मसंबंध- दोन आत्म्यांचा संबंध - आहे.

पूर्वपुण्य शुद्ध असेल, तरच सद्‍गुरूंची गाठ पडणार. जर जीव हा तितक्याच अधिकाराचा असेल, तर सद्‍गुरु त्याचेसाठी आपण होऊन धावत येतात.

एखाद्या शिष्याबद्दल सद्‍गुरूंना प्रेम वाटते. याला दृश्य कारण काहीच असत नाही. परंतु त्यात पूर्व जन्मीचे काहीतरी धागेदोरे असतात, हे निश्चित. एखाद्या शिष्याची सद्‍गुरूंचेवर दृढ निष्ठा असते. गुरु त्या शिष्यावर अधिक प्रेम करतात व त्यांच्या कृपेने शिष्याचा साधनात लवकर प्रवेश होतो. सद्‍गुरूंनी ज्याला आपला म्हटला, त्या जीवाला ऐहिक व पारमार्थिक दृष्ट्या काहीच कमी पडत नाही.

सद्‍गुरु आपल्या शिष्याला आपल्यापेक्षा कनिष्ठ मानीत नाही. त्याला शिष्य आत्मरूपच दिसतो. म्हणून तो आत्मीयतेने शिष्याला डबोले देतो.

नियम असा की :- सद्‍गुरूंनी सांगितलेले साधन शिष्याने निष्ठेने केले पाहिजे तरच परमार्थातील अनुभव येतात.

सद्‍गुरु अनुग्रहाचे वेळी शिष्याचा अहंकार घालवितात. पण आपण तो पुनः आपल्याला चिकटवून घेतो. मग सद्‍गुरूंनी सांगितलेले साधन कसे जमणार ? सद्‍गुरु संपूर्ण समाधान देतात, परंतु आपण ते बिघडवून टाकतो.

गुरूंशी वितंडवाद करणे हा मूर्खपणाच आहे. सद्‍गुरूंची आज्ञा भंग करणे हा दोष आहे. गुरूची विद्या गुरूलाच फळली असे होऊ नये, व कुठून शिष्याला बोध केला असे गुरूला वाटण्याचा प्रसंग येऊ नये. जीवाचा स्वभावच असा आहे की आपले अंतःकरण खरेखुरे सद्‍गुरूंपाशी प्रकट करावे, असे त्याला वाटत नाही.

सद्‍गुरूंचे अंतःकरण ओळखून, त्यांची उपासना केली, तरच जीवाला खरेखुरे समाधान आहे. एखादा शिष्य सद्‍गुरूंनी सांगितलेले ऐकत नसेल, तर त्याची काय गत होईल ती शब्दांत सांगता येणार नाही. सद्‍गुरूंनी सांगितलेले साधन शिष्य करीत राहिला, तर सद्‍गुरूंना आनंद होतो. शिष्याने नाम-रूपाची ओळख करून घेतली की गुरूला धन्यता वाटते. शिष्याच्या कीर्तीनेही गुरूला खरा आनंद होतो. आपल्यापेक्षाही आपले शिष्य अधिकारी व्हावेत, असे ख‍र्या गुरूला वाटते. ज्या गुरूला शिष्याकडून झालेला पराभव आवडतो, तो गुरु खरा.

गुरूचा मोठेपणा शिष्यावर. नुसता गुरु अधिकारी असून चालत नाही. त्याचा शिष्यही अधिकारी व योग्यतेचा पाहिजे. म्हणजेच दोघांनाही मोठेपणा मिळतो.

परमार्थातील कोणतीही गोष्ट सतत चालावयाची असेल तर सद्‍गुरूच्या सामर्थ्याची सत्ता व शिष्याचा निश्चय या दोन गोष्टी आवश्यक आहेत. या दोन गोष्टी नसतील, तर कोणतीही गोष्ट कायम चालू रहाणार नाही. शिष्याचा निश्चय आहे पण सद्‍गुरूंची सत्ता नाही किंवा सद्‍गुरूंची सत्ता आहे परंतु शिष्याचा निश्चय नाही, अशा दोन्ही स्थितीत कोणतीही गोष्ट सातत्याने चालणार नाही.

प्रश्न : प्रश्न : परमार्थात गुरुकृपेची काय आवश्यकता आहे ?

उत्तर :उत्तर : सद्‍गुरुकृपेशिवाय परमार्थात एक पाऊलदेखील पुढे पडणार नाही. ज्याच्यावर सद्‍गुरूची कृपा असेल, त्यालाच आत्मसुखाचा लाभ होणार आहे. आत्मानुभवासाठी गुरुकृपेचीच आवश्यकता आहे. उन्मन होणेचा मार्ग गुरुकृपेशिवाय सापडत नाही. कृपा झाल्यावर साधनसिद्धीस वेळ लागत नाही. गुरुकृपेशिवाय जीवनात विश्रांति नाही. गुरुकृपेने न घडणा‍र्या गोष्टी घडतात. गुरुकृपा ही अलौकिक आहे.

उपदेश किंवा अनुग्रह हे दोन्ही होण्यास गुरु व शिष्य एकत्र येण्याची आवश्यकता असते. परंतु कृपेचे तसे नाही. कृपा कोठूनही करता येते. गुरु दिल्लीला असो व शिष्य मुंबईला असो; गुरु तेथून कृपा करू शकतो. सद्‍गुरु सांगलीला व शिष्य लंडनला असला तरी गुरुकृपा होऊ शकते. सद्‍गुरूची कृपा काय करते व काय न करते, हे सांगता येणार नाही.

देहातीत असणारे गुरु हे देहबाधा असणा‍र्यावर कशी कृपा करणार ? चार देहांच्या लाकडी ठोकळयांना जोपर्यंत आपण चिकटून आहोत, तोपर्यंत गुरुकृपेच्या विजेचा झटका बसणे शक्य नाही. सद्‍गुरूंची कृपा सहजासहजी होत नाही. त्याला खडतर साधनाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. ज्या प्रमाणात साधनाचा अभ्यास त्या प्रमाणात सद्‍गुरुकृपा होणार. शिष्याने आपली भूमिका बनविली की गुरुकृपा होते. निष्ठेशिवाय गुरुकृपा नाही. ज्यांच्यावर एकदम कृपा झाल्यासारखी वाटते, त्यांनी मागे अभ्यास केलेला असतो. ज्याची पूर्वपीठिका भक्कम आहे, त्याच्यावर एकदमच कृपा होते. गुरुकृपा ही कोणावर, कशी व केव्हा होईल हे सांगता येणार नाही.

कृपा असेल तर नामगति व प्राणगति एकच होते. सद्‍गुरुकृपेने अवस्था बदलली की आपोआप चैतन्याकडे वृत्ति वळते. चैतन्याची खेच सुरू होणे हा गुरुकृपेचा पहिला अनुभव आहे.

जीव, नाम व ब्रह्म हे एकरूपच आहेत. परंतु त्यांची ओळख व्हावयास सद्‍गुरुकृपा पाहिजे.

अनुभव घ्यावयाचा असेल, तर चैतन्याचे माध्यम सापडले पाहिजे. त्यासाठी सद्‍गुरूची गाठ पडायला पाहिजे आणि त्याची कृपा व्हायला पाहिजे.

श्री गुरुदेव, यशवंत हो, जयवंत हो

posted on 02-Mar-2016