Alternate Text

प्रकट दिन सोहळा - २०१५

!! यशवंत हो जयवंत हो !!

प्रकट दिन सोहळा - दिनांक २५ नोव्हेबर २०१५

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पोर्णिमा असेही म्हणतात . या दिवशी दिवाळी प्रमाणे वास्तूमध्ये, अंगणात , मंदिरात, पवित्र ठिकाणी दिवे लावतात. दीपमाळ प्रज्वलित करतात. दीपदान करतात . गंगास्नान करतात . मंदिरा समोरील उंच दगडी दीपमाळेतील सर्व दिवे पाजळतात . श्री क्षेत्र कुरोली सिध्धेश्वरातील सर्व भाविक भक्त कार्तिक पौर्णिमेच्या अगोदर एक महिना उपवास करतात . उपवासाचा समारोप म्हणजे कार्तिक पोर्णिमास रात्रीचा जागर, पहाटेची काकड आरती, सकाळची, दुपारची, संध्याकाळची आरती , भजन, कीर्तन, प्रवचन, इ. मध्ये भक्तांना महिनाभर भक्तीच्या गंगेत डुबता येते. कुरोलीतील शिवमंदिर हे शिवकालीन व जागृत तीर्थक्षेत्र आहे. या शिवमंदिराच्या शिवलींगातून आजही शिवानाद घुमत असतो . शिवानाद ऐकणे म्हणजे लाखो भक्तांच्या आनंदाला उधान येणे . सर्वत्र भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दिपोस्तव साजरा करतात.

देशभरातील सर्व शिवमंदिरात हर हर महादेव अशी हाळी, दिपोस्तवाची दिवाळी आणि भक्तांची मांदियाळी म्हणजे कार्तिक पोर्णिमा . श्री यशवंत बाबा कुरोलीत रमले. सुर्यातेजाला गोणपाटात किती दिवस झाकायचे असा प्रश्न देवदेवतांना पडला. श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराजांना (शेगाव) राहवले नाही. न भूतो न भविष्यती अशी भव्य पायी दिंडी प्रथमच व एकदाच कुरोलीत आली . सिद्धेश्वराच्या प्रशस्त, पवित्र परिसरात मुक्काम थाटला . दुसऱ्या दिवशी दिंडी पुढे मार्गक्रमण होण्याचा व कुरोलीत सिद्धेश्वर यात्रेचा दिवस अर्थात कार्तिक पौर्णिमेचा होता. यात्रेमुळे गावकरी, वारकरी, पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मुंग्यांप्रमाणे गर्दी झाली होती . सर्वसाधारण दहा हजार भाविकांचा जनसमुदाय जमला होता . साखर विस्कटल्याप्रमाणे माणसेच माणसे होती .

दिंडीच्या नित्य प्रथेनुसार भला मोठा पुष्पहार हत्तीच्या सोंडेत दिला. हत्ती संथ गतीने गर्दीतून वाकडी वाट करून पुढे सरसावू लागला. माहुताला हत्तीला रोखणे अवघड झाले. बाबा स्टॅंडच्या दगडी कठड्यावर एखाद्या महाराजाप्रमाणे ऐटीत बसले होते. गजराज गजगतीने बाबांच्या पुढ्यात आला. सोंडेतील पुष्पहार बाबांच्या गळ्यात घातला.पुढचे गुडघे टेकवले व नतमस्तक झाला. सोंडेने श्री चरणांना विळखा घातला. उठून प्रणाम केला.

सर्व जनसमुदाय आवाक झाला. डोळयांचे पारणे फिटले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट व्हावा तसा टाळ्यांचाही कडकडाट झाला. सर्व आसमंत बाबांच्या जयघोषाने दुमदुमला. सर्वांनी बाबांना हात जोडून प्रणाम केला.

यावर श्री महाराज गजराजास उद्गारले- " का रे बाबा, आम्ही इतक्या दिवस झाकून ठेवलेले क्षणार्धात उघडे केलेस. "

श्री महाराज हे चिंध्याधारी देह धारण करणारे भगवंत आहेत हे लोकांनी जाणले . याला जनता जनार्दनाची साथ होती . सुर्यनारायनाची साक्ष होती . यशवंत नारायणाची उपस्थिती होती . श्री यशवंत नारायणाने विश्वकल्याणार्थ मांडलेल्या अखंड पारायणाचा हा श्री गणेशा होता . अर्थातच कार्तिक पौर्णिमा म्हणजेच श्री यशवंत बाबांचा प्रकटदिन . या प्रकटदिनी श्री महाराजांच्या संजीबन समाधीवर पुष्पवृष्टी होते . महाआरती, महाप्रसाद, चहाप्रसाद, भजन, कीर्तन, इ. लाभ घडतो. अन्न, वस्त्र, निवारा, स्नान अशा मानवाच्या कोणत्याच गरजा श्री महाराजांच्या गरजा नव्हत्या . अशा स्वयंभू श्री यशवंताच्या प्रकाटदिन सोहळ्यास आपले येणे घडो .

संदर्भ " चहामंथन " ग्रंथ

posted on 24-Nov-2015